फट्टू - भाग - ७ वा - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY
![]() |
मराठी भयकथा |
" मामी ,काय विचारतोय ? सांगणार आहात का ? " आणि काशीबाईने सांगायला सुरुवात केली .
आता पुढे :- सावित्री ! नक्षत्रासारखी सुंदर पोर ! खरं तर तिचं नांव स्वाती किंवा आश्लेषा ठेवणार होते . पण तिच्या आजीचं म्हणजे वडिलांच्या आईचं नांव सावित्री होतं . आजीचा आपल्या मुलामध्ये खूप जीव होता . म्हणजे सावित्रीच्या वडिलांमध्ये . सावित्रीचा जन्म होण्या अगोदर एक वर्ष आजी वारली .
सावित्रीच्या जन्मापूर्वी ची गोष्ट ! आजींना म्हणजे सावित्रीबाईंना काळजी वाटत होती . जीवाला घोर लागला होता . आपल्या मुलाला म्हणजे सावित्रीच्या वडिलांना म्हणजे रंगाला मुलबाळ होत नव्हतं . सुरुवातीची दोनतीन वर्ष वाट पाहण्यात गेली . घराण्याला वारस हवा ! संपत्तीला वारस हवा ! पण मुलाची वाट पाहत पाहत तीन वर्ष गेली . आणि आता असं वाटायला लागलं की जे होईल ते चालेल .मुलगा असो की मुलगी !
पण ते ही दिव्य ठरत होतं . सावित्रीबाईंनी रंगाला व त्याच्या बायकोला म्हणजे काशीबाईला एके रात्री बोलावलं , आणि सरळ ठणकावून सांगितलं ," हिला मूल होत नाही ! एक तर मूल होईल असं बघ ! नाहीतर दुसरं लग्न कर ! " " दुसरं लग्न ? पण आई हीचा काय दोष ?" "मग काय तुझ्यात दोष आहे ? " "आईssss !" "ओरडू नकोस . तुझी मर्दानगी तुझ्या बायकोजवळ दाखव ! नाहीतर दुसऱ्या बाईजवळ ! एक मूल काढता येत नाही आणि माझ्यावर ओरडतोय ! "
रंगाला लाजल्याहून लाजल्यासारखं झालं . त्यानंतर तो तडक बाहेर निघाला . व बरीच रात्र झाल्यावर घरी आला . कुठे गेला होता कुणास ठाऊक ? पण काशी जवळ झोपल्यावर तिला फरक जाणवला . त्याने कसा ध्यासच घेतला होता एकच ! काहीही झालं तरी मूल पाहिजेच ! ना रात्र पाहत होता ना दिवस ! काशीबाई थकून जायची ! पण काय बोलणार ? विरोध केला तर हा दुसरं लग्न करेल ! आणि आपलं भविष्य संपून जाईल ! शेवटी त्याच्या मर्दानगीवर त्याच्याच आईने संशय घेतला होता . तिच्याही बाई होण्यावर बोट ठेवलं होतं . त्यामुळे थोडे दिवस त्रास सहन करावा लागणार होता . तो एकच पर्याय होता .
दिवसाढवळ्या दार बंद करून यांचा कार्यक्रम सुरु राहायचा . सावित्री बाई पहारा देत राहायची . कुणी आलं कि काही कारण सांगून बाहेरच्या बाहेर रवाना करायची . रोज रात्री काहीवेळ रंगा बाहेर जायचा . व आल्यावर 'हे काम ' सुरु व्हायचं ! काशीबाईने बऱ्याचदा विचारलं ,पण तो सांगेल तर शपथ !
एक दिवस काशीबाईने ठरवलं ,त्याच्या मागे जायचं , नकळतपणे जायचं ! रात्र झाली तसा रंगा बाहेर पडला ,काशीबाईला कळेना ? सासूबाईला चुकवून त्याच्यामागे कसं जायचं ते ? पण सासूने स्वतः विचारलं ,"हा रोज कुठे जातो गं ? आणि काही फरक वाटतोय का ? काशीबाईने लाजून मान खाली घातली . सावित्रीबाईंना गहिवरून आलं . त्यांनी प्रेमाने काशीबाईला जवळ घेतलं . मायेने डोक्यावरून हात फिरवला . त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू होते . त्यांनी काय पाहिलं कुणास ठाऊक ? "पोरी ,लवकरच आनंदाची बातमी देशील असं दिसतंय !" त्या काशीकडे डोळे भरून पाहत होत्या .
तेवढ्यात रंगा आला . या दोघीना सोबत बघितलं ,त्याला आश्चर्य वाटलं . त्याच्या आईने कधी नव्हे ते मायेने बघितलं होतं . पण रंगाला आता माया दाखवणं शक्य नव्हतं . तो तडक आत गेला . व काशीबाईला आवाज दिला . तिच्या अंगावर सर्रकन काटा आला .' आता परत ? ' पण नाईलाज होता . तिने मदतीसाठी सावित्रीबाईकडे बघितलं . सावित्रीबाईला तिच्या नजरेतील भाव समजला असावा . त्यांनी नजर फिरवून घेतली . काशी समजली याना आपल्या त्रासाशी काही घेणं नाही . नाईलाज झाला .ती आत गेली व दार लावून घेतलं .
काहीवेळात काशीचे उसासे सावित्रीबाईंच्या कानावर यायला लागले . त्यांच्या नजरेत चमक होती . ' आपण हेच पहिले का बोललो नाही ? तीन वर्ष वाट बघायची गरज पडली नसती . पण .... अचानक सावित्रीबाईंचा जीव घाबरायला लागला . श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला . " रंगाsss ,रंगा ssss " पण आवाज तोंडातच राहिला . समोर जे काही होतं ते भासमान होतं ,कि सत्य ? पण जीव घेण्यास पुरेसं होतं !
काशीबाई सकाळी उठली . दार उघडलं आणि तिने आरोळी ठोकली . "सासूबाई ssss " सावित्रीबाईंचे डोळे सताड उघडे होते ! त्यांचा प्रवास संपला होता . त्या अनंतात विलीन झाल्या होत्या . त्यांना देवाज्ञा झाली होती . त्यांचं जीवन कार्य संपलं होतं . तिच्या आवाजाने रंग उठून बसला . तडक बाहेर आला . आईकडे बघितलं . त्याच्या नजरेतील चमक पाहून काशीबाईला आश्चर्य वाटलं . यांची आई वारलीय ! आणि यांच्या नजरेत समाधान दिसतंय ? म्हणजे यांनी तर काही ... ?
काही वेळात गावात बातमी पसरली . गाव जमा झालं . सावित्रीबाईंचे रंगाशिवाय आता कुणी नव्हतं . त्यामुळे वाट बघण्याची थांबण्याची गरज नव्हती . लवकरच अंत्यविधी आटोपला . संध्याकाळ पर्यंत जो तो आपल्या घरी गेला .
काशीबाईला हा त्रास सहन होईना ! आणि ताणही सहन होईना ? याचा इलाज काय करायचा ? रात्र झाली , रंगा जवळ आला . पण आता काशीबाईचा निर्धार झाला होता . तिने रंगाला स्पष्ट शब्दात खडसावलं . " अहो ,काय माणूस आहेत कि जनावर ? सकाळीच तुमच्या आई वारल्या ! आणि तुम्ही ... ? हे बघा मला हा त्रास सहन करणं शक्य नाही . सासूबाई होत्या म्हणून सहन केलं ! आता नाही ! तुम्ही दुसरं लग्न करून घ्या ! माझी हरकत नाही ! "
रंगाने शांतपणे ऐकून घेतलं . तो अलगद काशीजवळ सरकला . तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला . तिचा चेहेरा आपल्या ओंजळीत धरला . आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला ,"त्याची काही गरज नाही कासू ! आता आई नाही ! आणि लवकरच आपल्या घरात नवीन पाहूणा येईल ! "
काशीला आपल्या बोलण्याचा पश्चाताप झाला . तिने अलगद रंगाचे हात बाजूला केले . त्याच्या छातीवर डोकं ठेऊन डोळे मिटले . " एक विचारू ?" "काय गं ?" " तुम्ही तर काही केलं नाही ना ?" रंगा काही बोलला नाही . तो विचार करत राहिला . " कासू ,एक सांगू ? काही प्रश्नांची उत्तरं न दिलेलीच बरी असतात . तू ताण घेऊ नकोस ! स्वतःला सांभाळ !"
रंगा एकटक कुठेतरी पहात राहिला . आपण केलं ते चुकीचं की बरोबर ? ते त्याला समजत नव्हतं . पण त्याचं उत्तर काळच देणार होता .....
TO BE CONTINUED ......
WATCH MUSICAL COVER SONGS ON OUR YOU TUBE CHANNEL 'MUSICAL RAITA '
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE & BGSM
- ABOUT US
- PRIVACY POLICY
👰👰👰👰👰👰👰👰👰👰👰